spot_img

काँग्रेसच्या देशव्यापी ‘वोट बचाओ, देश बचाओ’ अभियानास सुरुवात ; १ नोव्हेंबरला दिल्लीत महारॅली

*भाजप सरकारकडून वारंवार देशातील लोकशाहीची हत्या : अरुणजी यादव*

बुलढाणा: 25 ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) : संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेला मतदानाचा अधिकार हा लोकशाहीचा मूलभूत आधार आहे. नागरिकांना आपल्या पसंतीच्या उमेदवाराची निवड मुक्तपणे आणि निर्भयपणे करता यावी, यासाठी निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष असणे आवश्यक आहे. मात्र देशात विधानसभा, लोकसभा असो वा अन्य निवडणुका.. या अधिकाराला लुटण्याचे आणि चोऱ्या करण्याचे काम भाजप सरकारांकडून केले जात आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि बिहार यांसारख्या अनेक राज्यांमध्ये निवडणुकांदरम्यान व्यापक प्रमाणात मताची चोरी करून सरकारे बनवली गेली. देशातील लोकशाहीची वारंवार हत्या देश आणि प्रदेशात बसलेल्या भाजप सरकारांकडून केली जात असल्याचा घणाघात माजी केंद्रीय मंत्री तथा वोट बचाओ, देश बचाओ अभियानाचे निरिक्षक अरुणजी यादव यांनी केला. तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रपतींकडे करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

काँग्रेस पक्षाच्या वतीने देशभरात ‘वोट बचाओ, देश बचाओ’ या देशव्यापी अभियानास सुरुवात झाली असून या अभियानांतर्गत बुलढाण्यात रविवार २५ ऑक्टोबर रोजी हॉटेल रामा ग्रँड येथे पत्रकार परिषद पार पडली. यावेळी अरुणजी यादव बोलत होते. या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ,जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील, माजी आमदार तथा लोकनेते राहुलभाऊ बोंद्रे, आमदार धिरजभाऊ लिंगाडे, माजी आमदार राजेशभाऊ एकडे, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रजी राख, प्रदेश सरचिटणीस शामभाऊ उमाळकर, प्रदेश सचिव रामविजयजी बुरुंगले, प्रदेश सचिव डॉ. अरविंदजी कोलते तसेच प्रदेश व जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी आणि सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना अरुणजी यादव म्हणाले की, काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘वोट बचाओ, देश बचाओ’चा लढा लढल्या जात आहे. या अभियानांतर्गत १ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या सहभागातून महारॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीच्या माध्यमातून मतदानाचा अधिकार, मतदार यादीची पारदर्शकता आणि लोकशाही संस्थांची विश्वासार्हता हे मुद्दे राष्ट्रीय स्तरावर मांडले जाणार आहेत. २५ ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबर या कालावधीत हे अभियान जिल्हा, ब्लॉक, मंडल आणि बूथ स्तरापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. गावोगावी जाऊन मतदार यादीची छाननी करणे, मतदारांच्या नोंदींबाबत जागृती निर्माण करणे, पात्र मतदारांची नावे यादीत आहेत की नाही याची पडताळणी करणे आणि संभाव्य त्रुटींबाबत संबंधित यंत्रणांकडे दाद मागण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन करणे, यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

*लोकशाहीच्या रक्षणासाठी दुसरा स्वातंत्र्यसंग्राम लढावा लागेल : हर्षवर्धनदादा सपकाळ*

लोकशाहीचा आत्मा असलेल्या मतदानाच्या अधिकारावरच घाला घातला जात असेल, तर केवळ निषेध करून चालणार नाही. लोकशाहीच्या रक्षणासाठी दुसरा स्वातंत्र्यसंग्राम लढावा लागेल, असा आक्रमक निर्धार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ यांनी व्यक्त केला. निवडक लोकांनी निवडक लोकांसाठी चालविलेला कारभार म्हणजे लोकशाही नव्हे. लोकशाही ही सर्वसामान्य जनतेची, जनतेसाठी आणि जनतेकडून चालणारी व्यवस्था आहे. मात्र, मतचोरीच्या आरोपांमुळे या व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची टीका त्यांनी पत्रकार परिषदेत केली. महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा आणि मतदारसंख्येचा संदर्भ देत हर्षवर्धनदादा सपकाळ यांनी मतदार नोंदणीच्या प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित केला. राज्याची लोकसंख्या सुमारे १४ कोटी असताना मतदारांची अपेक्षित संख्या आणि प्रत्यक्ष नोंदणीकृत मतदार यामध्ये मोठी तफावत आढळून येते. महाराष्ट्रात १० कोटी मतदार अपेक्षित असताना प्रत्यक्ष संख्या ७ कोटींच्या आसपास राहिली, तर उर्वरित तीन कोटी मतदार कुठे गेले, याचे उत्तर कोण देणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत