* 2009 मध्ये खा. जाधव यांच्याकडे होते फक्त 1 कोटी 27 लाख * शेती, हॉटेल, कंपनी, पेट्रोल पंपमुळे वाढले उत्पन्न

बुलढाणा, 2 एप्रिल (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) ः चंद्र वाढतो कलेकलेने परंतु खा. प्रतापराव जाधव यांची संपत्ती पटीने वाढत आहेत. सन 2009 मध्ये पहिल्यांदा जेव्हा त्यांनी खासदारकीची निवडणूक लढविली होती, तेव्हा निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात 1 कोटी 27 लाख 2 हजार 820 रुपये त्यांची संपत्ती असल्याचे नमूद केले होते. 2019 मध्ये म्हणजे दहा वर्षानंतरचे त्यांची संपत्ती दहा पटींनी वाढल्याचे दिसून आले. पाच वर्षांपूर्वी त्यांच्याकडे 11 कोटी 26 लाख 72 हजार 966 रुपयांची संपत्ती होती. तर आज रोजी खा. प्रतापराव आणि त्यांच्या कुटूंबाकडे सुमारे 16 कोटी 31 लाख 60 हजार 428 रुपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रात देण्यात आले आहे. शेती, हॉटेल (परिवार), जगदंबा कंपनी, जगदंबा ऑटोमोबाईल्स-पेट्रोल पंप मुळे त्यांच्या उत्पन्नात चांगलीच वाढ झाली आहे. याशिवाय खासदारांना मिळणारे मासिक मानधन त्यांची संपत्ती फुगविण्याला कारणीभूत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या संपत्ती वारसा हक्काने मिळालेल्या जवळपास 2.50 कोटी रुपयांचा मोठा वाटाही आहे. 63 वर्षीय प्रतापराव चिखली येथील शिवाजी महाविद्यालयातून बी.ए. भाग 1 पर्यंत शिकलेले आहेत. दिल्लीच्या संसद हाऊस एसबीआय शाखेतून त्यांनी 14 लाख 67 हजार 110 रुपयांचे कर्ज घेतलेले आहे. फोर्ड इंडीव्हर कंपनीची चारचाकी (एमएच 28 बीके 0077) त्यांच्याकडे आहे. जिचे बाजारमूल्य 44 लाख 77 हजार रुपये आहे.
उमेदवारी नामांकन दाखल करतांना उमेदवाराला निवडणूक आयोगाकडे शपथपत्र दाखल करणे अनिवार्य आहे. खा. प्रतापराव जाधव यांनी एकुण 44 पृष्ठांचे शपथपत्र दिले आहे. त्यात जंगम आणि स्थावर मालमत्तेचे वर्णन देण्यात आले आहे. याशिवाय कर्ज, विमापत्र, शेअर्स यांचाही उल्लेख शपथपत्रात आहे. स्वतः प्रतापराव यांच्याकडे 3 लाख 50 हजार रुपये रोख आहेत. तर त्यांच्या अर्धांगिनी सौ. राजश्रीताई यांच्याकडे 1 लाख 80 हजार रुपयांची रक्कम आहे. त्यांची सर्वाधिक ठेव स्वतः अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र अर्बनमध्ये आहे. मेहकर शाखेमध्ये 93 लाख 25 हजार 192 रुपये प्रतापराव यांनी मुदती ठेवमध्ये गुंतविले आहेत. राजश्रीताईंचे याच शाखेत 36 लाख 69 हजार 343 रुपये आहेत. रूज अॅग्रोटेक प्रोड्यूसर कं. लि. अंजनी बु. याठिकाणी दोन्ही पती-पत्नींची प्रत्येकी 30 हजार रुपयांची भागिदारी आहे. तर जगदंबा ट्रेडींग अंजनी. बु. मध्ये राजश्रीताईंची 48 लाख 52 हजारांची भागीदारी रक्कम आहे. हॉटेल परिवार अंजनी बु. 15 लाख 68 हजार 947 रुपये तसेच जगदंबा ऑटोमोबाईल मध्ये 34 लाख 21 हजार 673 रुपये भागीदारी स्वरुपात आहे.
स्वतः प्रतापराव सोन्याचे आभूषण घालतात. साखळी, दोन अंगठ्या, ब्रासलेट असे 100 ग्रॅम सोने त्यांच्याकडे आहे. सौ. राजश्रीताईंकडे एकुण 1 किलो 80 ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत. त्यात 3 मंगळसुत्र, दोन पाटल्या, दोन जोड, 8 अंगठ्या, एक मोहनमाळ, एक पोहेहार, एक नेकलेस, एक राणीहार, दोन कडे, एक चपलाहार, एक कजरीहार, दोन डूल, पायातले तोडे, सोन्याच्या दहा पाटल्या असा एकुण 71 लाख 28 हजार 200 रुपये किंमतीचे दागिने राजश्रीताईंकडे आहे.
रिसोड, लोणार, मेहकर, मादणी, निमखेड (दे.राजा) याठिकाणी प्रतापराव यांच्या शेतजमिनी आहेत. सौ. राजश्रीताईंकडे मेहकर, खंडाळा, खामगांव (10 एकर 30 गुंठे), अंजनी बु., शेगांव, देऊळगांवराजा तालुक्यातील गोळेगांव आणि निमखेड तसेच सिंदखेडराजा तालुक्यातील सावरगांव माळ याठिकाणी शेती आहे. तर खासदारांकडे मेहकरमध्ये एक आणि शेगांवमध्ये दोन ठिकाणी प्लॉट आहेत. मेहकरमध्ये 10 लाख 80 हजार रुपये किंमतीचे एक गोडावूनही त्यांच्या नावावर आहे. पत्नीकडे आडगांव (वाशिम) मध्ये दोन, मेहकरमध्ये दोन प्लॉट आहेत. त्यांच्या नावावर बिबडेवाडी पुणे येथे हर्मेस हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये 78 लाख रुपये किंमतीचा फ्लॅट आहे. शेगांव मध्ये 1200 स्न्वेटर फूट आणि संभाजीनगरमध्ये विद्यानगर, जालना रोड याठिकाणी शुभम अपार्टमेंटमधील दूसर्या मजल्यावर फ्लॅट आहे.
खा.प्रतापराव यांच्यावर धनादेश अनादराचा कलम 138 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. 2015 चे हे प्रकरण शारंगधर शुगर मिल्स लि. उकळी ता. मेहकर या कंपनीेचे कर्ज परतफेडीसाठी दिलेला धनादेश अनादरीत झाल्याचे आहे. अर्थात या प्रकरणात त्यांनी वरच्या कोर्टात पुनरिक्षण याचिका दाखल केलेली आहे.