
बुलढाणा, 16 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी): शहरभरातील वाढत्या वेगावर पोलिसांचे नियंत्रण नसल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. बुलढाणा शहरातील गजबजलेल्या संगम चौकात, १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी एका भरधाव स्पोर्ट्स बाईकने दुचाकीला भीषण धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, धडक देऊन स्पोर्ट्स बाईकस्वार आणि त्याचा साथीदार घटनास्थळावरून पसार झाले आहेत. या अपघातामध्ये पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषदचे कर्मचारी वैभव दिलीप डांगे हे अपघातात जखमी झाले आहेत. वाहतुकीला शिस्त आणि नियमनाची जबाबदारी जिल्हा वाहतूक शाखा आणि शहर पोलीस यांच्यावर संयुक्तपणे आहे. जिल्हा वाहतूक शाखेचे नेतृत्व सध्या एपीआय प्रताप बोस यांच्याकडे आहे. अशा अपघातांमुळे वाहतूक पोलिसांच्या कर्तव्यबद्धतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून वाहतूक शाखा बेछूट वाहने चालविणाऱ्यांविरोधात कधी आपला ‘प्रताप’ दाखवेल असा सवाल बुलढाणेकर उपस्थित करीत आहेत.
बुलढाणा शहर पोलिस स्टेशनमध्ये स्पोर्ट्स बाईक चालका विरोधात ज्ञानेश्वर वाकोडे यांनी तक्रार दाखल केली आहे. वैभव डांगे व त्यांचे सहकारी ज्ञानेश्वर वाकोडे हे चहा पिण्यासाठी जात असताना एम एच २१ बीपी १२०१ क्रमांकाच्या भरधाव स्पोर्ट्स बाईकने रस्ता एम एच ३२ एक्स ४७६० क्रमांकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वार रस्त्यावर फेकल्या जाऊन गंभीर जखमी झाला. अपघात घडताच घटनास्थळावर मोठी खळबळ उडाली. मात्र, मदत करण्याऐवजी स्पोर्ट्स बाईक चालवणारा तरुण आणि त्याच्या सोबत असलेला साथीदार यांनी गाडी सोडून पळ काढला. ज्ञानेश्वर वाकोडे यांनी गंभीर जखमी झालेले वैभव डांगे यांना शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सायंकाळच्या वेळी संगम चौकात नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते. अपघाताच्या घटनेनंतर बघ्यांची मोठी गर्दी जमल्याने चौकातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच एका पोलीस कर्मचाऱ्याने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी अथक प्रयत्न केले. मात्र, बघ्यांच्या वाढत्या गर्दीमुळे काही काळ संगम चौकात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. संगम चौक हा शहरातील अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा चौक मानला जातो. या चौकात दररोज सायंकाळी वाहतुकीची कोंडी होत असल्याने अपघात घडण्याची शक्यता असते. त्यामुळे सायंकाळच्या सुमारास संगम चौकात वाहतूक शाखेचा एक पोलीस कर्मचारी कायमस्वरूपी तैनात करण्यात यावा, अशी संतप्त आणि जोरदार मागणी स्थानिक नागरिक व वाहनधारकांकडून केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास प्रकाश बाजड करीत आहे.





Total Users : 1366915