केळवदच्या युवा गोलरक्षकाची मोठी झेप; म्यानमारविरुद्धच्या मैत्रीपूर्ण सामन्यांसाठी भारतीय संघात स्थान
बुलढाणा : चिखली तालुक्यातील केळवद येथील युवा फुटबॉलपटू अर्णव राजेंद्र पांढरे याने आपल्या जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर भारतीय फुटबॉलमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. म्यानमारविरुद्ध ४ आणि ७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मैत्रीपूर्ण सामन्यांसाठी भारतीय अंडर-१७ पुरुष फुटबॉल संघात त्याची गोलरक्षक म्हणून निवड झाली आहे. अर्णवच्या या निवडीमुळे केवळ केळवद गावाचाच नव्हे, तर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचा गौरव वाढला आहे.
अर्णवने वयाच्या अवघ्या नवव्या वर्गात शिक्षण घेत असतानाच राष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. अंडर-१४ गटातील त्याची उत्कृष्ट कामगिरी लक्षात घेऊन रिलायन्स फाउंडेशनने त्याची निवड केली होती. त्याचबरोबर त्याला शिक्षणासाठी शिष्यवृत्तीही प्रदान करण्यात आली होती. या संधीचा लाभ घेत अर्णवने फुटबॉलमधील आपला सराव आणि कौशल्य अधिक विकसित केले. सातत्यपूर्ण मेहनत, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि मैदानावरील प्रभावी कामगिरीच्या बळावर त्याने भारतीय अंडर-१७ संघात स्थान मिळविण्याचा टप्पा गाठला आहे.
गोलरक्षकाची भूमिका ही फुटबॉलमध्ये अत्यंत महत्त्वाची आणि जबाबदारीची मानली जाते. प्रतिस्पर्धी संघाचे आक्रमण परतवून लावत संघाच्या विजयात निर्णायक योगदान देण्याची संधी गोलरक्षकाला असते. अशा महत्त्वाच्या भूमिकेसाठी अर्णवची निवड होणे ही त्याच्या कौशल्याची पावती मानली जात आहे.
अर्णवचे वडील राजेंद्र रामराव पांढरे हे अभियंता असून गुजरात येथे कार्यरत आहेत, तर आई सरलाताई गृहिणी आहेत. कुटुंबाच्या पाठबळासह अर्णवने फुटबॉल क्षेत्रात घेतलेली झेप कौतुकास्पद ठरत आहे.
केळवदसारख्या छोट्या गावातून भारतीय संघापर्यंतचा अर्णवचा प्रवास जिल्ह्यातील नवोदित खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. त्याच्या या यशाबद्दल क्रीडाप्रेमी, ग्रामस्थ आणि जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आगामी सामन्यांत अर्णवकडून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





Total Users : 1409051