स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; १६ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र मुद्देमालासह हस्तगत
खामगाव, दि. ८ (गुड इव्हिनिंग सिटी) : खामगाव शहरात शिक्षिकेचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून पसार झालेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेले सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत केले असून, या कारवाईमुळे शहरातील मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा झाला आहे.
दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी ४७ वर्षीय शिक्षिका खामगाव शहरातील तुकाराम सभागृहाजवळून जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांचा पाठलाग केला. शिक्षिका घराजवळ पोहोचत असताना आरोपींनी दुचाकीचा वेग कमी करून संधी साधली आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून नेले. या घटनेत सुमारे १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीस गेले होते. याप्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४८८/२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४(३)(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणासह गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार भूषण बाळू पाटील (वय २२, रा. अशोकनगर, शिरसोली, ता. जि. जळगाव) याला जळगाव येथील सुभाष चौक परिसरातून ताब्यात घेण्यात आले. पोलिसी चौकशीत त्याने साथीदारासह सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपीकडून चोरीचे १६.०३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले असून, त्याची सध्याच्या बाजारभावानुसार किंमत सुमारे २ लाख १९ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड, अपर पोलिस अधीक्षक खामगाव पीयूष जगताप, पोलिस निरीक्षक हेमंत ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. पथकातील पोलीस कर्मचारी दीपक लेकुरवाळे, चाँद शेख, गणेश पाटील, पोलीस गणेशन गोरे, निलेश राजपूत आदींचा कारवाईत सहभाग होता. पुढील तपास खामगाव शहर पोलीस करीत आहेत.





Total Users : 1420064