एलसीबीच्या पथकाची कारवाई
बुलढाणा, 10 ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) : गांजाची वाहतूक करणाऱ्या बुलडाण्यातील चार महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा पथकाने मलकापूर ते मोताळा रोडवरील नळगंगा ढाबा समोरील डिडोळा शिवारामध्ये एका ऑटोमध्ये बेकायदेशीररीत्या गांजाची वाहतूक करणाऱ्या चार महिलांना रंगेहात पकडले असून, त्यांच्याकडून एकूण २ लाख १ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ९ ऑक्टोबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाला माहिती मिळाली की, काही महिला मलकापूरकडून बुलढाणाकडे गांजा विक्रीकरिता घेऊन जात आहेत. या माहितीच्या आधारे बोराखेडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलकापूर-मोताळा रोडवरील डिडोळा शिवारातील नळगंगा ढाबा समोर येथे सापळा रचण्यात आला. पोलीस पथकाने कारवाईदरम्यान एक ऑटो अडवून तपासणी केली असता, त्यात चार महिला गांजा बाळगून असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून ४ किलो २ ग्रॅम गांजा किंमत २ लाख १०० रुपये आणि ३ मोबाईल किंमत १ हजार ५०० रुपये असा एकूण २ लाख १ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पंचनाम्याद्वारे जप्त करण्यात आला. तपासादरम्यान आरोपी महिलांनी सदरचा गांजा हा योगेश जैस्वाल यांची पत्नी रा. कुऱ्हा काकोडा, जि. जळगाव हिच्याकडून आणल्याचे समोर झाले आहे. त्यानुसार फिर्यादी पोहेकॉ विजय विठ्ठल पैठणे यांच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यामध्ये बुलढाणा शहरातील चार महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे व त्यांच्या पथकातील अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.





Total Users : 1421587