चाकूचा धाक दाखवून लसूण अन् पैसे चोरणारा चोरटा पोलिसांच्या ताब्यात
बुलढाणा, 3 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी): आठवडी बाजार परिसरात भाजी विक्रेत्याला चाकूचा धाक दाखवून रोख रकमेसह लसणाची चोरी करणाऱ्या आरोपीस बुलढाणा शहर पोलिसांनी अवघ्या काही तासांत बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आरोपीकडून संपूर्ण मुद्देमाल जप्त केला असून त्याला न्यायालयात हजर करण्यात येत आहे.
बुलढाणा तालुक्यातील गुम्मी येथील रहिवासी रेखा दिनकर नरोटे या भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. २ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास त्या आठवडी बाजार परिसरातील मंडीच्या गेटसमोर उभ्या असलेल्या मालवाहू वाहनाजवळ होत्या. त्यावेळी आरोपी मनोहर उर्फ लहान्या कैलास पवार वय ३१, रा. वार्ड क्र. २, बुलढाणा याने चाकूचा धाक दाखवून नरोटे यांच्या पतीला धमकावले. आरोपीने वाहनातील सुमारे २ हजार ४०० रुपये किमतीचा १६ किलो लसूण आणि फिर्यादीच्या पतीच्या खिशातील २ हजार रुपये रोख बळजबरीने हिसकावून घेतले. यानंतर आरोपीने फिर्यादीच्या पतीस मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली व घटनास्थळावरून पसार झाला.
या प्रकरणी रेखा नरोटे यांच्या फिर्यादीवरून बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून आरोपी मनोहर उर्फ लहान्या पवार याला अटक केली. त्याच्याकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईसाठी माननीय न्यायालयात हजर करण्यात येत आहे. शहरात अशा प्रकारचे गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर यापुढेही अत्यंत कठोर आणि प्रभावी कारवाई केली जाईल. नागरिकांनी परिसरात कोणतीही संशयास्पद घटना किंवा व्यक्ती आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील यांनी केले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप कायंदे करत आहेत.





Total Users : 1351613