बुलढाण्याच्या सौंदर्याला कचर्याचे गालबोट
राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांनी व्यक्त केली चिंता
बुलढाणा, 18 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) : बुलढाणा शहर हे अजिंठ्याच्या डोंगर रांगांमध्ये वसलेले शहर आहे. या शहराला नैसर्गिक सौंदर्य व शांतप्रिय शहर म्हणून नाव लौकिक आहे. परंतु शहरातील मुख्य रस्त्यावर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
विपुल निसर्गसंपदा आणि आल्हाददायक हवामानासाठी ओळखल्या जाणाऱ्या बुलढाणा शहराच्या सौंदर्याला सध्या रस्त्यांवरील कचऱ्याचे गालबोट लागले आहे. शहराला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांवर साठलेल्या कचऱ्यामुळे आणि प्रशासकीय अनास्थेमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी बुलढाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विशेष निवेदन दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात राधेश्याम चांडक यांनी स्पष्ट केले की, कधीकाळी अतिशय स्वच्छ आणि टुमदार असणारे बुलढाणा शहर आता विस्तारीकरणासह महानगराचे रूप घेत आहे. शहरात वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि कृषी महाविद्यालयांमध्ये राज्यभरातून व देशातून सुमारे ६ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जेव्हा या विद्यार्थ्यांचे पालक किंवा अन्य पाहुणे शहरात येतात, तेव्हा प्रवेशद्वारांवरच पसरलेला कचरा आणि दुर्गंधी पाहून शहराबद्दल अत्यंत वाईट संदेश जातो. नगर परिषद आणि आसपासच्या ग्रामपंचायती मालमत्ता कराच्या माध्यमातून नागरिकांकडून कर गोळा करतात, मात्र कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारायला कोणीही तयार नाही. यापूर्वी पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाची गरज: जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे प्रमुख असून त्यांचे बुलढाणा शहराशी आणि येथील सांस्कृतिक चळवळीशी पूर्वीपासून जवळचे नाते आहे. त्यामुळे नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या असून त्यांनी या प्रकरणात थेट हस्तक्षेप करावा. शहराच्या सर्व प्रवेशद्वारांवरील कचरा उचलण्यासाठी आणि स्वच्छतेचे नियोजन करण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास समिती मधून विशेष बाब म्हणून निधीची तरतूद करण्यात यावी.
बुलढाण्याला लाभलेला निसर्गरम्य वारसा टिकवून ठेवण्यासाठी आणि शहरात येणाऱ्या अतिथींमधील तिरस्काराची भावना थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी आग्रही विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.