आ. कायंदे यांचे पॅनल लंगडे !
बुलढाणा, 12 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत ) : मागील 14 वर्षांपूर्वी ज्या बँकेच्या कर्जबुडव्या संचालकांच्या विरोधात आंदोलन केले होते, त्या बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेमध्ये संचालक रूपाने आमदार संजय गायकवाड यांची सहकार क्षेत्रात पहिली एन्ट्री झाली आहे. धाडसी निर्णयांसाठी प्रसिद्ध असलेल्या आ. गायकवाड यांनी आपल्या पहिल्याच प्रतिक्रियेत म्हटले आहे की, जिल्हा बँकेच्या खर्चातून संचालक मंडळाने प्रवास भत्ता किंवा स्वतःला लाभदायी असा इतर कुठलाही खर्च करू नये. इतकेच काय तर बँकेच्या खर्चातून कुणी चहा सुद्धा पिऊ नये. आर्थिक शिस्त आणि योग्य नियमनाने जिल्हा बँकेला गत वैभव प्राप्त होईल, हा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गुड इव्हिनिंग सिटीशी पुढे बोलताना आमदार गायकवाड म्हणाले की, जिल्हाभरामध्ये ग्राम सोसायटींचे जाळे विणलेले आहे. या सोसायटीचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढवून त्यांना आर्थिक सक्षम बनवले गेले तर पर्यायाने त्या त्या ठिकाणच्या शेतकरी वर्गाला याचा मोठा फायदा होईल. शेतकऱ्यांना शेतीसाठी किंवा उद्योगासाठी हवे असलेले कर्ज सहज आणि सुलभ उपलब्ध करून देण्यावर जिल्हा बँकेने भर द्यावा तसेच शेतकऱ्यांना कागदपत्रांसाठी कुठलेही हेलपाटे घ्यावे लागू नये, यासाठी जिल्हा बँकेला काही धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी संचालक म्हणून आम्ही सर्व भाग पाडू, असेही श्री. गायकवाड म्हणाले.
मागील काळात बँक अवसायनात गेल्यानंतर अनेक सरकारी विभागांनी आपली खाती जिल्हा बँकेतून काढून घेतली होती. त्या विभागांना पुन्हा जोडण्यासाठी सुरक्षित आर्थिक व्यवस्था आणि विश्वास निर्माण केला जाईल, हे महत्वाचे विधानही आ. गायकवाड यांनी केले.
कायंदेंचे पॅनल लंगडे !
सहकार पॅनल विरोधात आमदार मनोज कायंदे यांनी आपले पॅनल उभे केले आहे, त्यावर आपली प्रतिक्रिया काय? असे विचारले असता आमदार संजय गायकवाड म्हणाले की, आमदार कायंदे यांना सहकार पॅनलने दोन जागा देऊ केल्या होत्या परंतु त्यांची मागणी पाच जागांची होती आणि त्यातही त्यांचा विशिष्ट जागांसाठी आग्रह होता जो, सामंजस्याची घडी विस्कळीत करणारा होता. आता 21 पैकी 12 जागांवर अविरोध संचालक निवडून आले आहेत. सहकार पॅनल कडे आजच बहुमत आहे. त्यामुळे आमदार मनोज कायदेंचे पॅनल लंगडे असल्याचा टोलाही आ. गायकवाड यांनी लगावला.





Total Users : 1361608