spot_img

कचरा डेपोविरोधात माळविहीरसह सावळा-सुंदरखेड रस्त्यावर !

हनवतखेडचा कचरा डेपा हलविण्याचा अट्टाहास कशाला ? माळविहीरच्या शेतकर्‍यांकडून आत्महत्येचा इशारा
बुलढाणा, १ ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) : यापूर्वी तीनदा माळविहीर परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडे लिखीत तक्रार करीत माळविहीरच्या कचरा डेपोला विरोध केला आहे.. माळविहीर ग्रामपंचायतने ग्रामसभेत अधिकृत ठराव घेवून हनवतखेडचा कचरा डेपो माळविहीरला हलवू नये, असा ठराव घेतला आहे.. याउपरही प्रशासन माळविहीरसाठी अट्टाहास का करीत आहे ? असा सवाल करीत शेकडो ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. विशेष म्हणजे केवळ माळविहीरच नव्हे तर सावळा, सुंदरखेड, पोखरी, भादोला वाडी आणि माळविहीरलगतच्या परिसरातील बुलढाण्याच्या नागरिकांनी धडक मोर्चात उत्स्फूर्त सहभाग दर्शविला होता. डंपींग ग्राऊण्ड परिसरातील शेतकर्‍यांनी तर आत्महत्येचाही इशारा आंदोलनातून दिला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून बुलढाणा शहरातील कचरा हनवतखेड परिसरात फेकला जात आहे. मलकापूर रोडवरील या भागात कचरा डेपा बनविण्यात आला आहे. कचर्‍यावर विघटनाची प्रक्रिया करण्यासाठी लाखो रूपये खर्च करून बुलढाणा नगर परिषदेने युनिटही उभारले आहे. मात्र काही महिन्यापूर्वी अचानक बुलढाणा नगर परिषदेने हनवतखेडचा कचरा डेपो शहरापासून ७ किलोमिटर अंतरावर माळविहीरच्या ई क्लास जमिनीवर हलविण्याचा निर्णय घेतला आहे. तत्कालिन जिल्हाधिकार्‍यांनी त्याला मंजूरीही प्रदान केली आहे. ‘आम्हांला विश्वासात न घेता, आमची मंजूरी न घेता, कचरा डेपो आमच्या भागात करणे अन्यायकारक आहे’, या भूमिकेसह माळविहीर ग्रामस्थांमध्ये आक्रोश आहे.
आज या निर्णयाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. गुड इव्हिनिंग सिटीशी बोलतांना आंदोलनकर्त्यांनी निर्णयाचा विरोध करतांना विविध कारणे दिली आहेत. सदर मार्गावर तीन शाळा आहेत. पोदार, सेंट जोसेफ, जे.जे. स्कूलच्या लहान विद्यार्थ्यांच्या आरोग्याला कचरा डेपोमुळे धोका निर्माण होणार आहे, माळविहीरच्या या कचरा डेपो परिसरातील पावसाचे पाणी प्रवाहातून डोंगरदर्‍यावाटे पलढग धरणात जावून तो प्रकल्प आणि डोंगर प्रदूषित होणार आहे, परिसरातील शेतीमध्ये काम करण्यासाठी मजूर येण्याचे टाळाटाळ करतील, शेतकर्‍यांना शेती करतांना मोठी अडचण निर्माण होईल, पर्यावरणाला हानि पोहोचणार आहे, केवळ भौगोलिकच नव्हे तर विद्यार्थी, ग्रामस्थ यांच्या सामजिक भविष्यावर दुष्परिणाम करणारा हा कचरा डेपो कायमस्वरूपी रद्द करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर जवळपास चार पृष्ठभरून ग्रामस्थांची स्वाक्षरी आहे. यात माळविहीर, सुंदरखेड, सावळा, भादोला वाडी या गावातील अनेक ग्रामस्थांचा यात समावेश आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत