spot_img

‌‘किर्ती‌’रूपी सुगंधाने दरवळला युवा महोत्सव !

‌‘युवा संस्पर्श-2026‌’ ला उत्कृष्ट व्यवस्थापनाचा परिस्पर्श

बुलढाणा, 3 ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) : कालच, अमरावती युवा महोत्सव ‌‘युवा संस्पर्श-2026‌’ चा समारोप झाला.. तब्बल 254 महाविद्यालयातील 6 हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी युवा महोत्सवात सहभाग दर्शवून कलागुणांचे वैविध्यपूर्ण प्रदर्शन केले.. राजर्षी शाहू इंजिनिअरिंग कॉलेजने अर्थातच व्यवस्थापन प्रमुख ॲड. किर्तीताई पऱ्हाड आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी युवा महोत्सवाचे यशस्वी आयोजन, नियोजन आणि संयोजन करून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठावर आपली यशस्वी छाप सोडली आहे. युवा महोत्सवाला यशाचे तोरण बांधून बुलढाण्याचा ‌‘किर्ती‌’रूपी सुगंध संपूर्ण राज्यात दरवळविणाऱ्या किर्तीताई बुलढाणेकरांचे भूषण ठरल्या, ही चर्चा सर्वत्र आहे.
बुलढाणा पंचक्रोशीतील गरीब आणि बहुजन विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणासाठी मेट्रो शहरांमध्ये होणारे स्थलांतर थांबवून त्यांची आर्थिक पिळवणूक थांबविण्याच्या सकारात्मक उद्देश्याने माजी आमदार ध्रृपतराव सावळे यांनी द्वारका ग्रामिण विकास फाऊंडेशनची स्थापना केली आणि जवळपास 20 एकरच्या परिसरात उच्च शिक्षणाची दालनं उघडली गेली. दोन दशकापूर्वी डी.एड्, बी.एड्. कॉलेज सुरु करण्यात आलीत. पिंप्रीआंधळे आणि गुम्मीमध्ये पहिलीपासून ते कॉलेजपर्यंत शिक्षणसंस्था उभी करण्यात आली. आता उच्च तंत्र शिक्षणाच्या वाटा खुल्या करण्यासाठीचे श्री सावळे यांचे प्रयत्न यशस्वी झाले.तत्कालिन मागासलेल्या बुलढाण्यात इंजिनिअरिंग कॉलेज उभं करणे आव्हान होते. परंतु श्री सावळे यांनी हे आव्हान पेलले. इंजिनिअरींग, फार्मसी, पॉलिटेक्निक कॉलेज सुरु झालीत. नुकतेच बीएएमएस महाविद्यालयाच्या रूपाने आणखी एक तुरा राजर्षी शाहू परिवाराच्या शिरपेचात खोवला गेला आहे. मागील दशकभरापासून राजर्षी शाहू परिवाराची सुत्रे श्री सावळे यांनी आपली सुकन्या ॲड. कितीताई पऱ्हाड यांच्याकडे सचिवपदासह सोपविली आहेत.
वरील पार्श्वभूमि थोडक्यात सांगायचे तात्पर्य म्हणजे ॲड. किर्तीताईंनी आपल्याकडे आलेल्या नेतृत्वाला वेगळी भरारी दिली. राजर्षी शाहू परिवाराला सक्षम आणि गुणात्मक दर्जेदार बनविण्यात किर्तीताईंचे परिश्रम कौतुकास्पद आहे. त्याचीच फलश्रृती म्हणजे त्यातून तब्बल 18 वर्षानंतर अमरावती विद्यापीठाचा युवा महोत्सव बुलढाण्यात झाला. युवा महोत्सवाच्या आयोजनाचे शिवधनुष्य किर्तीताईंनी उचलले. आयोजनात कुठेच ‌‘तडजोड‌’ नव्हती. प्रत्येक गोष्ट गुड नव्हे तर ‌‘एक्सलन्ट‌’ झाली पाहीजे, यावर त्यांचा भर राहीला. निश्चीतच त्यांच्या सोबत वडील ध्रृपतराव सावळे आणि पति डॉ. समीर पऱ्हाड यांचे मार्गदर्शन, राजर्षी शाहू परिवारातील 200 शिक्षक-प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी, समन्वयक म्हणून 350 विद्यार्थी आणि स्वतःचा मित्रपरिवार सहकार्यासाठी तत्पर होता. लोकगीत, लोकनृत्य, सुगम संगीत, एकांकिका, स्कीट, माईम, वादविवाद, वक्तृत्व यासह विविध 16 स्पर्धाप्रकार विनाअडथळा यशस्वी पार पडले. अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला आणि बुलढाणा या पाचही जिल्ह्यातून युवा महोत्सवात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट आयोजनाचा अनुभव घेतला. युवकांचा उत्साह उर्जीत ठेवण्यासाठी राजर्षी शाहू परिवाराचा प्रत्येक जण झटला. त्याचाच परिपाक म्हणजे बुलढाण्यातील ‌‘युवा संस्पर्श-2026‌’ युवा महोत्सवाची आठवण कुलगुरु, विद्यार्थी विकास परिषद मंडळ, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, सिनेट मेंबर, सहभागी प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या मनात कायमची साठवून राहिली आहे.

कर्तव्यदक्षतेसह संवेदनशीलता !
महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी, 1 ऑक्टोबर रोजी युवा महोत्सवादरम्यान नृत्य स्पर्धा सुरू असताना अमरावती येथील काही विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. अशा प्रसंगी कीर्तीताई यांनी दाखविलेली समयसूचकता, तत्परता आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता खरोखरच कौतुकास्पद ठरली. त्यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली आणि संस्थेच्या परिसरातील आयुर्वेद महाविद्यालयाच्या वैद्यकीय पथकाला तातडीने बोलावून विद्यार्थ्यांना प्राथमिक तपासणी व आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या. या संपूर्ण प्रक्रियेत सहकार्य करणारे बी.ए.एम.एस. महाविद्यालयाचे डॉ. प्रितमसिंग ठाकूर आणि त्यांच्या संपूर्ण वैद्यकीय पथकाने घेतले धडपड उल्लेखनीय होती. संकटाच्या क्षणी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, हेच खऱ्या नेतृत्वाचे लक्षण आहे. या प्रसंगाने भारावलेल्या प्रा. सुजीत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, ‌‘कीर्तीताई यांच्या या संवेदनशीलतेने आणि कर्तव्यदक्षतेने अनेकांच्या मनात त्यांच्याविषयीच्या आदराला द्विगुणीत केले आहे‌’.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत