कार्डसाठी १९९ ऐवजी २५० रूपयांची करत होता वसुल
बुलढाणा, दि. १३ ऑक्टोबर : राज्यात दुष्काळाचे सावट असताना सुध्दा काही लोक गोरख धंदा करत आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सवलतीच्या प्रवासासाठी आवश्यक असलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) नोंदणीसाठी निर्धारित शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारली जात असल्याचा प्रकार बुलढाणा बसस्थानकावर उघडकीस आला आहे. कार्ड नोंदणीसाठी १९९ रुपये निर्धारित असताना एका प्रवासी महिलेकडून २५० रुपये आकारण्यात आल्याचे सुरक्षा व दक्षता विभागाच्या पडताळणीत निष्पन्न झाले. याप्रकरणी संबंधित कंपनी प्रतिनिधीविरुद्ध पुढील कारवाईसाठी अहवाल सादर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसेच महिला प्रवाशांना सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्ड उपलब्ध करून देण्यात येत आहे. या कार्डच्या नोंदणी व वितरणासाठी मे. ईबिक्स टेक्नॉलॉजीज कंपनीच्या अधिकृत प्रतिनिधीची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्ड नोंदणीसाठी १९९ रुपयांपेक्षा अधिक शुल्क आकारू नये, अशा सूचना असतानाही बुलढाणा बसस्थानकावर प्रवाशांकडून अतिरिक्त रक्कम घेतली जात असल्याची माहिती सुरक्षा व दक्षता विभागाला मिळाली होती
या माहितीची खातरजमा करण्यासाठी १३ ऑक्टोबर रोजी सुरक्षा व दक्षता अधिकारी जयंत कांडलकर, सुरक्षा निरीक्षक छगन ते. बाहेकर आणि सहाय्यक सुरक्षा निरीक्षक (प्रशिक्षणार्थी) परेश श. चिंचोरे यांनी बसस्थानकावर जाऊन पडताळणी केली केली असता सदर कंपनी प्रतिनिधी हे कार्ड काढणाऱ्या प्रवाशाकडून सर्रास 250 रुपये घेत असल्याचे दिसून आले यावेळी गोपनीय पद्धतीने एका महिला प्रवाशामार्फत कार्ड नोंदणीची प्रक्रिया करून घेतली असता, संबंधित कंपनी प्रतिनिधीने निर्धारित १९९ रुपयांऐवजी २५० रुपये शुल्क आकारल्याचे आढळले. म्हणजेच प्रवाशाकडून ५१ रुपये अतिरिक्त घेण्यात आले.
या प्रकरणात संबंधित महिला प्रवाशाचा जबाब नोंदविण्यात आला. तसेच मे. ईबिक्स टेक्नॉलॉजीज कंपनीचे प्रतिनिधी अक्षय मंगल जाधव यांनीही प्रवाशांकडून २५० रुपये घेतल्याचे मान्य केल्याचे समजते.
निर्धारित शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारल्याप्रकरणी संबंधित प्रतिनिधीला जबाबदार धरण्यात आले असून, सुरक्षा व दक्षता अधिकारी जयंत कांडलकर यांनी पुढील प्रशासकीय कारवाईसाठी अहवाल विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, बुलढाणा विभाग यांच्याकडे सादर केला आहे.
प्रवाशांनी निर्धारित शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारली जात असल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.





Total Users : 1425977